ओरिजिनल पीस

शुभंकरोती झाल्यावर कोणी आजूबाजूला नाही, हे बघून मी देवाजवळ आपली रिक्वेस्ट परत एकदा मांडली, “देवा, फक्त एक. पण छोटंसं. मोठं दिलंस, तर आई घाबरेल. उजव्या हाताला झाल्यास उत्तम. उजवाच हात का, हे तुझ्या लक्षात आलंच असेल. पण आता लवकरात लवकर”. माझा धीर सुटत चालला होता आता. देव छोट्या मुलांचं ऐकतो, आणि त्याला अकरा वर्षाची मुलं जास्त आवडतात, असं आई परवा म्हणाली होती. त्यामुळे देव माझं पण ऐकेल, याबद्दल खात्री होती मला.

दोन-चार दिवसांपूर्वी मी आणि बाबा चिंत्याला बघायला गेलो होतो. त्याचा एक हात प्लॅस्टरमध्ये होता आणि त्याची मम्मी त्याला आपल्या हातानं टरबूजाचे काप भरवत होती. बाबा त्याची विचारपूस करत होते त्यावेळी त्याचा चेहरा अभिमानानं फुलून आला होता. जणू मोठा पराक्रम केल्याचा आव आणत होता. मीही त्याची प्राथमिक चौकशी केली.

“दुखतंय का रे?”

“पहिले दोन दिवस. आता नाही”.

“पण प्लॅस्टर…”

“अरे काही त्रास नाही त्याचा. उलट, त्याच्यामुळेच माझी मजा चाललीये”.

“म्हणजे?”

“अरे, मम्मी आपल्या हातानं भरवते. इतरही सगळे लाड करते. शाळा बंद, प्लॅस्टरमुळे लिहिता येत नाही म्हणून अभ्यास पण पूर्णपणे बंद. अगदी कंटाळा येईपर्यंत टीवी पाहतो. आणि सगळ्यात मोठा फायदा ठाऊकाय? एक दिवसाआड अंघोळ. प्लॅस्टर ओलं होऊ नये म्हणून.”

म्हणजे एकूण चिंत्या फ्रॅक्चर होऊनही मजेत होता तर. फ्रॅक्चर म्हणजे हात-पाय मोडणे, भयंकर त्रास वगैरे, अशी माझी समजूत होती. पण फ्रॅक्चर झाल्यावर एवढ्या सोयी-सुविधा मिळतात, हे मला ठाऊकच नव्हतं.

आमच्या चौकडीत फ्रॅक्चर न झालेला मी एकटाच उरलो होतो. सगळ्यात आधी संजू सायकलवरून पडली आणि पाय मोडून घेतला. नंतर आशू घसरगुंडीवर घसरला आणि खांद्यावर प्लॅस्टर लावून पलंगावर आडवा झाला. आणि आता चिंत्या. त्याच्या मते तरी फ्रॅक्चरचे बरेच फायदे होते. खात्री करून घेण्यासाठी मी परत संजू आणि आशूला एकेक करून पकडलं.

“किती दिवस शाळेतून सुट्टी मिळाली तुला?”

“आई हातानं भरवायची?”

“आणि टीवी पहायची फुल परमिशन?! काय सांगतेस?”

“गिफ्ट्स पण मिळालीत? काय लकी आहेस रे.”

झालं. त्या सगळ्यांचं ऐकल्यावर मला तर त्यांचा हेवा वाटायला लागला. फ्रॅक्चर झालेल्यांचं नशीब फळफळतं हे ठाऊक नव्हतं मला. आशूला भेटून आलो तो निर्धार करूनच.

उजवा हात मोडलेला (डावा मोडला तर बाथरूममध्ये ‘वेगळाच’ प्रॉब्लेम होतो). पांढरे शुभ्र प्लॅस्टर. त्यावर भेटायला आलेल्यांच्या सह्या. शाळेला आणि अभ्यासाला सुट्टी. बाबांचं रागावणं नाही. मला त्रास द्यायचा नाही म्हणून तायडीला बाबांनी दिलेली समज. आणि भरपूर चारोळी टाकून माझी आवडती शेवयांची खीर आईच्या हातून खाणारा मी. अहाहा. अद्भुत!

हे सगळं प्रत्यक्षात येणं देवाला प्रसन्न केल्याशिवाय शक्यच नव्हतं. मग देवाचं फुल अटेंशन असावं म्हणून शुभंकरोती थोडं जोरात म्हणायला लागलो. आणि शेवटी मला एक तरी, छोटंसं फ्रॅक्चर होऊ दे, अशी रोज प्रार्थना करू लागलो. “देवाला फक्त बुद्धी मागून मिळत नाही, प्रयत्न केले तरच देव देतो”, असं आई म्हणाली होती मागे. जे बुद्धीसाठी खरं असेल, तेच फ्रॅक्चरला पण असणार, म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. फिल्डिंगच्या वेळी बॉल अडवताना कारण नसताना उगाच पडू लागलो. घसरगुंडीवर वेग वाढवला. जिन्यावर शेवटच्या तीन पायऱ्या एका उडीत पार करू लागलो. सायकल चालवताना दोन्ही हात सोडून देत होतो. पण देवबाप्पा इतर मुलांचे लाड पुरवण्यात गुंतला असावा. या सगळ्याचा परिणाम असा झाला की गुडघे खरचटले. एकदा कपाळावर भलं मोठं टेंगूळ उगवलं, दोनच दिवसात गायब. पण फ्रॅक्चर होईल तर शप्पथ. एकदा जिन्यावरून उडी मारताना पाय मुरगळला. बाबा डॉक्टरकडे घेऊन गेले. पण माझ्या अपेक्षेवर त्यांनी लगेच पाणी फेरलं. “फक्त मुरगळलाय थोडा. आयोडेक्स लावा रोज, आठवड्यात बरं होईल. फक्त शाळेत जाताना जरा जपून”. या डॉक्टर लोकांना लहान मुलं कळतच नाहीत. निदान प्लॅस्टर तरी? पण तेही नाही.

फ्रॅक्चर काही केल्या होत नव्हतं. शिवाय डेटॉल लावताना आई रागवायची ते जास्त लागायचं. तिला काय ठाऊक की मी एक वेगळीच तपश्चर्या करतोय. फ्रॅक्चरची. आणि देवबाप्पा काही केल्या प्रसन्न होत नव्हता. मी गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागतोय असं बाबांना वाटायला लागलं, तर मी वेडा झालोय आणि मला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करायला पाहिजे असं तायडी चिडवायला लागली. मी हार मानणार नव्हतो, पण दोन आठवड्यांनी थोडा धीर सुटायला लागला.

त्या दिवशी चिंत्याच्या वाढदिवसाला गेलो, तेंव्हा मला बघताच त्याचे पप्पा म्हणाले, “अगं, आपला एकमेव ओरिजिनल पीस आलाय, बरं का?”. मला तर आधी काही कळलंच नाही. पण त्याची मम्मी “हो ना, बाकी सगळे काही ना काही मोडून बसलेत, हाच एकटा काय तो वन पीस आहे आता”, असं बोलली तेंव्हा उलगडा झाला. सगळे हसले. मीही हसलो. पण घरी परत येईपर्यंत मी त्याचाच विचार करत होतो.

खरंच की. या दृष्टीनं मी विचारच केला नव्हता. मीच एकटा वन पीस होतो आता. आणि अचानक मला माझा अभिमान वाटायला लागला. द ओन्ली ओरिजिनल. वा वा, क्या बात है. झोपण्यापूर्वी पटकन देवाला हात जोडले आणि माझी फ्रॅक्चरची प्रार्थना विसर, अशी नवी प्रार्थना केली.

दोन दिवसांनी सकाळी उठलो तर थोडा ताप होता. माझा चेहरा बघूनच आई म्हणाली, “बरं नाही का”? लगेच माझ्या कपाळाला हात लावून तपासलं आणि म्हणाली, “मन्या, ताप आहे बाळा तुला. आज शाळेला सुट्टी. किती वेड्यासारखी दगदग करतोस रे. आज तुला आवडणारी शेवयांची खीर करते. भरपूर चारोळी घालून”.

“पण तू तुझ्या हातानं भरवणार असशील, तरच खाईन”, मी म्हणालो.

“बरं, माझ्या हातानं खाऊ घालीन. अकरा वर्षांचा झालास पण लाडोबाच राहिलास अजून”. आई हसून म्हणाली. त्यावर तायडीनं केलेल्या फुटकळ कोटीकडे मी लक्षच दिलं नाही.

आई खीर खाऊ घालताना देवबाप्पाचं आपल्याकडे लक्ष आहे, याची खात्री पटली. परवा फ्रॅक्चर कॅन्सलची मागणी केली, हे बरंच झालं म्हणायचं.

One thought on “ओरिजिनल पीस”

Leave a Reply