“इथून जवळच आहे आता. हे शेवटचं वळण”. कर्जतच्या हिरव्यागार निसर्गातून आपली गाडी दामटत जयू म्हणाला. “पुढे एक ढाबा आहे, तिथे जेवणाची ऑर्डर देऊन पुढे जाऊ. तो सगळं काही आपल्या पत्त्यावर आणून देईल”.
ढाब्यावर दारूसोबतचे स्नॅक्स, डिनरला बटर चिकन, नान, बिर्याणी, अशी भली मोठी ऑर्डरच त्यांनी दिली. सगळं काही एका तासात जयूच्या बंगल्यावर पाठवण्याचं मालकानं मान्य केलं आणि गाडी मार्गस्थ झाली. बऱ्याच काळानंतर त्या चौघांचा योग जुळून आला होता आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला घरून परवानगी सुद्धा मिळाली होती.
जयेश, मनोज, नील आणि वेंकी हे चौघे कॉलेजपासूनचे मित्र. खूप मस्ती करायची आणि खूप अभ्यास करायचा, हे सूत्र पाळून त्यांनी इंजिनियरिंगची पदवी मिळवली. जयेश हुशार आणि त्या चौकडीचा नेता. मनोज अतिशय तापट आणि भांडायला तत्पर. कॉलेजमध्ये कुठे भांडण, मारामारी झाली की हा पळतच जाणार त्यात भाग घ्यायला. नील त्याच्या अगदी विरुद्ध. अतिशय शांत, कविमनाचा. आर्थिक हलाखीतून वर आलेला असला तरी त्याचा आत्मविश्वास जबरदस्त होता. आपण आयुष्यात काहीतरी करणार, हे त्याचं ब्रीदवाक्य. त्याचाच परिणाम म्हणून की काय, पण सगळ्यांनीच चार वर्षं मन लावून अभ्यास पण केला. त्या तिघांमध्ये वेंकी कसा मिसळला हे मात्र एक कोडं होतं. भित्रा, नुसतं कुठे खुट्ट जरी वाजलं तरी मनोजच्या मागे लपणारा, त्यांच्या मदतीशिवाय अभ्यासात धडपडणारा वेंकी त्यात एकमेव अपवाद. पण कायम आनंदी, हसतमुख.
शिक्षण पूर्ण झालं आणि प्रत्येक जण आधी आपापल्या करियर आणि नंतर संसारात गुंतून गेला. पण चौघांचा एकमेकांशी संपर्क मात्र होताच. काही वर्षं इकडे-तिकडे घालवल्यावर सगळेच पुण्यात स्थिरावले आणि अधूनमधून फॅमिली डिनरच्या निमित्तानं भेटी होऊ लागल्या. पण आता जवळपास एक वर्षाचा कालावधी मधे लोटला होता आणि त्यांची भेट काही होत नव्हती. शेवटी जयूनं पुढाकार घेतला आणि काहीही झालं तरी येत्या शनिवारी त्याच्या कर्जतच्या फार्महाऊसवर जायचंच, कोणीही सबब सांगायची नाही, असा दम भरला. त्या चौघांची मैत्री ठाऊक असल्यामुळे बायकांची पण संमती मिळाली आणि बेत एकदाचा फायनल झाला. तिन्हीसांजेला जयूची गाडी त्याच्या फार्महाऊसमध्ये दाखल झाली. बाहेर आभाळ भरून आलं होतं.
“मस्त खाऊ, पिऊ, आणि सकाळपर्यंत ताणून देऊ. ऑफिसची कटकट नको, आणि बायकोचीही. साला असा योग परत परत जुळून यायला पाहिजे”. दारातून आत जाताना वेंकी बोलला आणि सगळ्यांनीच हसून त्याला मान्यता दिली.
“काय भयानक शांतता आहे यार इकडे? पुण्यात रात्री दोन वाजले तरी रस्त्यावर ट्रॅफिक सुरूच.” मनोज म्हणाला.
“अरे, म्हणूनच असं लांबवर घेतलं हे घर. जवळपास कोणाचं घर पण नाही, आणि रहदारी पण नाही. दारू पिऊन कितीही गोंधळ घाला, कोणी भांडायला पण येणार नाही”. जयू म्हणाला.
“रामू वर्माच्या रात सिनेमाची आठवण झाली हा बंगला पाहिल्यावर. या बंगल्यात पण तशी एखादी मांजर तर नाही ना? करायला गेलो एक, आणि झालं भलतंच, असं व्हायचं नाहीतर.” वेंकी म्हणाला.
“कोणाकडून घेतलास हा बंगला? खात्री करून घेतला ना? तळघर वगैरे तपासून घेतलं ना?” भेळ कालवत नीलनं देखील मस्करीत उडी घेतली.
“कसले हलकट मित्र आहात रे? पुण्यातल्या रेट्यातून तुम्हाला बाहेर काढून इथे घेऊन आलो, त्याचे थँक्स तर राहिलेच, पण भुताच्या भयकथा रचताय या घराबद्दल?” जयूनं पेग भरले, बर्फ टाकून सोडा ओतला आणि चौघांनी आपापले ग्लास उचलून चियर्स केलं, आणि ग्लास ओठाला लावला.

आणि अचानक दिवे गेले.
अगदी थोड्या वेळेपूर्वी संधिप्रकाशात न्हाऊन निघालेला तो प्रशस्त दिवाणखाना अंधारात बुडून गेला. आणि एवढं जणू कमी होतं म्हणून बाहेर धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली.
“थांबा, मेणबत्त्या आहेत आपल्याकडे”. जयूनं एक-दोन कप्पे धुंडाळून मेणबत्त्यांचा शोध लावला आणि सगळ्यांनीच एक समाधानाचा सुस्कारा टाकला. तो भलामोठा हॉल अंधारात बुडलेला असला तरी त्या मध्यवर्ती टेबलावर दोन-चार मेणबत्त्या विराजमान झाल्या आणि त्या अंधुक प्रकाशात कर्जतच्या रियल इस्टेटवर चर्चा रंगू लागली. आपणही असाच एक बंगला घेऊन टाकावा असं इतर तिघांचंही मत बनलं. दुसरा पेग संपत आला आणि अचानक कोणीतरी समोरचं दार ठोठावलं. त्या शांत वातावरणात तो आवाज जरा जास्तच मोठा वाटला.
जयूनं दार उघडलं. बाहेरच्या मिट्ट अंधारात त्याला एक सहा-फुटी आकृती दिसली. सर्कशीतला तंबू वाटावा असा रेनकोट त्या आकृतीनं परिधान केला होता. भरगच्च दाढीमागे त्याचा चेहरा लपला होता आणि हातात एक भलं-मोठं पुडकं होतं.
“पोपट शेटनं पाठवलंय. तुमची ऑर्डर द्यायला आलोय”. त्याच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडताच सगळ्यांनीच हुश्श केलं. नाही म्हटलं तरी त्याचा अवतार बघून मंडळीची जरा टरकली होती. “जड आहे. सांगा कुठे ठेवू ते.”
सगळ्यांनी त्याला टेबलावर जागा करून दिली व त्यानं ते अवजड पुडकं त्या टेबलावर ठेवलं. त्या अंधारातच त्यानं आपली नजर सगळीकडे फिरवली. अंधारात नीट पाहण्यासाठी त्यानं आपले डोळे मोठे केले आणि आपल्या खर्ज आवाजात रंगमंचावर स्वगत म्हणावं, तसं तो पुटपुटला, “ते आत्मे दिसताहेत तुम्हाला?”
आत्मे?! मोठ्या कष्टानं लावलेले दोन पेग खाडकन उतरावे, तशी सगळ्यांची अवस्था झाली. “कसले आत्मे? काहीतरी काय बरळतोस? तूही चढवून आलाहेस का?” थोडं दरडावूनच मनोजनं विचारलं. “तुझं काम झालं ना, निघ मग आता”.
“मी दारू पीत नाही तुमच्यासारखी”, थोडं चिडूनच तो बोलला. “म्हणूनच तुम्हाला जे दिसत नाही, ते मी बघू शकतोय. त्यांचे हावभाव मला दिसताहेत, कळताहेत”. त्या अंधारातच त्यानं दृष्टी खिळवली व कान टवकारून कुजबुज ऐकावी, असे आविर्भाव करत तो पुढे बोलला, “या घरातच मृत्यू झालेल्या लोकांचे अतृप्त आत्मे आहेत ते. त्यांचं कार्य पुरं करायला त्यांना अजून एक सोबती हवा. म्हणजेच आज रात्री इथे एक मृत्यू होणार, हे निश्चित. त्यांचं वर्तुळ पूर्ण होणार”. हे बोलताना त्याचे डोळे एवढे मोठे झाले होते, की ते कोणत्याही क्षणी खोबणीतून निसटून बाहेर पडतील, असं वेंकीला वाटलं.
“अरे ए, वेडा आहेस का तू? तुला निघ म्हणून सांगितलं ना?” मनोजनं त्याला दाराकडे अक्षरशः ढकललंच. त्याबरोबर तो जणू त्या तंद्रीतून बाहेर आला. परत एकदा सभोवताली त्यानं नजर फिरवली आणि काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो आलेल्या दारातून बाहेर पडला.
त्या दोन-चार मिनिटांच्या प्रसंगानं नाही म्हटलं तरी चौघांना जरा धक्का बसला होता. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. शेवटी ती कोंडी मनोजनं फोडली. “अरे त्या वेड्याचं मनावर घेताय की काय? काही होत नाही कोणाला. साला सगळा मूड खराब केला त्यानं. मीच बनवतो आता पेग.”
“पण ते सांगताना त्याचा चेहरा बघितला का कोणी?” वेंकी अजूनही जरा त्या धक्क्यातच होता. “एका वेगळ्याच विश्वात होता तो. समाधी लागल्यासारखा. त्याच्याकडे बघताना असं वाटत होतं की त्याला खरोखरच कोणी आत्मा दिसतोय.” सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे, हे बघून त्यानं आपला मुद्दा पुढे रेटला, “गावांमध्ये अशा सिद्धी असलेले बुवा असतात. हा पण त्यातला नसेल कशावरून?”
“मूर्ख झालास का वेंकी? सिद्धी प्राप्त असलेला माणूस त्या पोपटच्या हॉटेलात नोकरी करेल?” मनोज शांत झाला नव्हता.
“आणि समजा असं काही झालंच, तर आपल्या हातात काही आहे? जे व्हायचं ते होऊ दे. आपण सुदैवी आहोत की आपल्यापैकी कोणाचा अचानक मृत्यू झालाच, तरी आपल्यामागे बायको-मुलांची आबाळ होणार नाही अशी आपली सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती आहे. बरोबर ना? मग का एवढा विचार करताय? पेग बनाओ यार जल्दी”. शांतपणे नीलनं आपलं तत्त्वज्ञान उलगडलं.
“बरोबर बोललास. आपला बँक बॅलेन्स, घर, गाडी, इन्वेस्टमेंट्स, त्यांनाच मिळणार.” जयेश म्हणाला.
“माझी तर तयारी आहे मरायला. मृत्यूसारख्या क्षुल्लक गोष्टीला आपण भीतच नाही”. मनोज अजूनही पूर्वीसारखाच बिंदास होता.
पेग बरोबर गप्पा सुरू होत्या, पण विषयांतर होऊनही वेंकी मात्र त्याच प्रसंगात अडकला होता, हे स्पष्ट दिसत होतं.
“खरं सांगायचं म्हणजे, मला मृत्यूची भीती वाटते. पण कधी-कधी असं वाटतं, नको हे जगणं. कंटाळा आला आहे रे आता.”
सगळ्यांना धक्काच बसला. “वेंकी, अरे काय झालं? असं का बोलतोस?” जयेशनं विचारलं.
“अरे, म्हणायला सगळं छान आहे. पण मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलंय ना? जवळ असलेलं सगळं सेविंग वापरून त्याला पाठवलं. नोकरीत सुद्धा खूप स्ट्रेस आहे. बॉस बरोबर पटत नाही. तो तर मला उडवायलाच टपला आहे. आपण जगत रहावं, असं एकही कारण दिसत नाही. पोराची शिक्षणाची सोय करून ठेवली आहे हेच काय ते समाधान” बाकी मी आता कफल्लक झालोय. दुसरी नोकरी शोधायचा कॉन्फीडन्स पण राहिला नाही आता”. वेंकी बोलला.
अचानकच स्मशानशांतता पसरली. वेंकीचं बोलणं अगदीच अनपेक्षित होतं. वरवर आनंदी दिसणारा वेंकी कसल्या परिस्थितीतून जातोय, याची कोणालाच कल्पना नव्हती.
“अरे, नको त्रागा करून घेऊस, वेंकी. आयुष्य आपली परीक्षा घेतच असतं. आता माझंच बघ ना. तुला तर नोकरीचा कंटाळा आलाय, पण माझी तर चक्क नोकरी गेलीय. माझी पोस्ट रिडंडेंट झाली आणि तीन महिन्यापासून रिकामाच आहे. बायकोला सांगायची हिंमत अजूनही झाली नाही. रोज सकाळीच ऑफिसला जायचं सांगून निघतो, कुठेतरी वेळ घालवून संध्याकाळी घरी येतो. तुमचासारखं सेविंग पण नाही माझं. परदेशात व्हॅकेशन्स, दर दोन-तीन वर्षात नवी गाडी, यातच सगळं गेलं. तो कोण यमदूत दिसला ना, तर मला घेऊन जा, असं सांगावसं वाटतंय”. मनोजनं दुसरा धक्का दिला.
“मन्या, अरे आधी का नाही बोललास? तीन महिने झाले तरी सांगितलं नाहीस?” थोडं सावरल्यावर जयेशनं विचारलं.
“काय सांगणार? अरे तुम्ही सगळे यशस्वी, पैसा-अडका सांभाळून आहात. तुम्ही आयुष्यभर दिलेले सल्ले मी ऐकले नाहीत, आता कुठल्या तोंडानं तुम्हाला सांगू हे सगळं?” मनोजच्या शब्दात अपराधबोध होता.
कदाचित दारूचा अंमल आता चढायला लागला होता, म्हणून आता चर्चा वेगळ्याच दिशेनं चालली होती. थोड्या वेळेपूर्वी आपण आयुष्यात कसे यशस्वी झालो आहोत, अशा समजात असलेल्या मित्रांचे वेगळेच स्वरूप समोर येत होते.
नीलच्या समोर असलेली मेणबत्ती विझल्यामुळे तो जवळपास अंधारातच होता. एरवी आपल्या भावना नियंत्रणात ठेवणारा नील त्या अंधाराचा फायदा घेऊन बोलता झाला, “सगळीकडे तेच आहे यार! तुम्हाला ठाऊकच आहे की मी तीन वर्षापूर्वी एका ऑफिस कलीगसोबत स्टार्ट-अप मध्ये पैसे गुंतवले होते ते. त्याच्याकडे लक्ष देता यावं, म्हणून नोकरी सुद्धा सोडली. पण आम्हाला फारसं काही काम मिळालंच नाही. सगळे सेविंग्स त्यात गुंतवले, जे काही थोडे फार पैसे होते त्यात ही तीन वर्षं काढली आहेत. अगदी दोन महिन्यानंतर काय होईल, काही सांगता येत नाही. त्यावरून घरी बायकोची कटकट रोजचीच झालीये. तिची स्वतःची नोकरी आहे, पण त्यातून काही भागत नाही यार”. अतिशय कळवळीनं नील बोलत होता.
“अरे, काय अगदी निर्वाणीची भाषा बोलतोस यार. तुझ्याकडे बघून तर आम्ही सगळे अभ्यासात सीरियस झालो. जे काही मिळवलं, ते त्यातूनच. निदान तू तरी अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस रे.” जयेश बोलला.
“जे आहे ते सांगितलं रे. लपवून तरी काय मिळणार? आणि असं कसलीच निश्चिती नसलेलं आयुष्य जगून तरी काय करायचं? फक्त इन्शुरन्स पॉलिसी मात्र चांगली घेतलीय, हेच काय ते समाधान. माझ्या माघारी बायको-मुलांचं भलं होईल, असं वाटतं. तो जाड्या बोलल्याप्रमाणे झालं तरी काही वाईट वाटणार नाही”.
“आपण तिघेही आयुष्याच्या परीक्षेत साफ नापास झालोय रे. फक्त आपला भाई जयेश यशस्वी झालाय, हेच कात ते समाधान.” मनोज इतर दोघांकडे बघून म्हणाला.
“यशस्वी? आणि मी? कारणे वेगळी असली तरी माझी अवस्था पण थोडी-फार अशीच आहे.” जयेश बोलला.
“म्हणजे?”
“नीलसारखंच. आमच्या कंपनीतल्या राजकारणाबद्दल मागे तुम्हाला सांगितलं होतंच. दोन महिन्यापूर्वी कंपनीच्या बोर्डानं पुअर परफॉर्मन्सच्या कारणानं मला सीईओच्या पदावरून पायउतार व्हायला सांगितलंय. त्या सिन्हानं सगळ्या बोर्डाला मॅनेज केलंय. बऱ्याच महिन्यांपासून माझ्या पोस्टवर त्याची नजर होतीच.” जयू म्हणाला.
“पण नोकरी गेली तरी सेविंग्स असतील ना? साल्या सीईओ होतास तू, बरेच शेअर्स पण असतील तुझ्याकडे, हो ना?” मनोजनं विचारलं.
“अरे, तिथेच तर सगळा घोळ घालून ठेवलाय ना मी. कंपनीच्या शेअरला बरी किंमत होती म्हणून सगळे सेविंग्स शेअर्समध्ये गुंतवले. आता त्याची वॅल्यू वन-फोर्थ झालीय. शिवाय घर आणि या फार्महाऊसचे हप्ते भरतोय. तो भुर्दंड आहेच मागे. विकतो म्हटलं तर कोणी हा फार्महाउस घ्यायला सुद्धा तयार नाही. खरं म्हणजे, तुमच्यापैकी कोणी घेणार का, असं विचारायचा बेत इथे येतानाच केला होता. पण आपली सगळ्यांनीच परिस्थिती सारखीच आहे, असं दिसतंय”.
आणलेली दारू एव्हाना संपली होती. एका रात्रीपुरतं सगळं विसरायचा बेत मात्र फसला होता. वरवर यशस्वी दिसणारे ते चार मित्र आयुष्याच्या लढाईत अयशस्वी होत होते. पैसा, यश, प्रसिद्धीचा प्रत्येकाचा मुखवटा गळून पडला होता. आणि मनातून आज रात्रीतून खरंच कोणाचा मृत्यू होणार असेल तर तो आपलाच झाला तर किती बरं होईल, असं प्रत्येकालाच वाटत होतं.
जेवायची कोणालाच इच्छा नव्हती. “इथेच बाहेर एक कुत्रा पडीक असतो. सकाळी जाताना त्याला सगळं अन्न टाकून देऊ”. जयेश बोलला आणि त्यांची बैठक बरखास्त झाली. रात्रीतून काय होणार, या विचारातच सगळ्याना झोप लागली.
सात वाजता नील जागा झाला व त्यानं इतरांना जागं केलं. मृत्यूच्या सावलीत झोपी गेलेले चौघेही मित्र आपापल्या श्वासाकडे क्षणभर लक्ष देत होते. जणू काही खात्री करून घ्यायची होती की सगळं खरंच संपलेलं नाही.
“इतके भित्रे आहोत का रे आपण? तो जाड्या काहीतरी बरळून गेला आणि त्याच्या नादात आपण इतके असहाय्य झालो? लानत है यार अपने उपर.” मनोज खाजिलपणे म्हणाला.
“खरंय रे. जेव्हा आपण परिस्थितीनं लाचार असतो ना, तेव्हा अशा प्रसंगानं आपल्या मनाची दुर्बलता अशी उघड होते. कदाचित ही घुसमट, ही खदखद बाहेर पडावी, असाच काहीसा हा डाव होता की काय, अशी शंका येतेय मनात.” नील नेहमीच्या शांत अविर्भावात बोलला.
“मला वाटतं यातून काहीतरी चांगलंच होईल. इतक्यात हरायचं नाही आपण कोणीही. आपण चौघे मिळून आपल्या समस्या सोडवू शकणार नाही का?” जयेश बोलला आणि सगळ्यांनीच त्याचं मानेनं अनुमोदन केलं. सगळ्यांनाच अगदी हल्कं वाटत होतं.
“एनीवे, झालं ते झालं. मस्त कॉफ़ी घेऊन निघू या.” वेंकीचं डोकं सकाळच्या कॉफीशिवाय काम करत नसे.
“हे सगळे जेवणाचे पार्सल्स बाहेर त्या कुत्र्याकरता ठेऊन जाऊ”. बाहेर पडताना जयेश म्हणाला.
जयेशनं दार उघडलं आणि समोरचं ते दृश्य बघून ते चौघेही अक्षरशः जागेवर थिजलेच. ज्या कुत्र्यासाठी ते जेवण ठेवून जाणार होते, तोच कुत्रा बंगल्याच्या आवारात मरून पडला होता.
जबरदस्त. शेवट तर अगदीच भारी, धक्कादायक.
कथा आवडली. 👍🏼