रॉय अंकल

“रॉय अंकल?!” मी अचानक त्याला बघून म्हणालो तसा तो मागे वळला. तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. इतक्या वर्षांनी बघितल्यामुळे त्यानं मला ओळखलं नाही, यात आश्चर्य काहीच नाही. शेवटी मीच ओळख सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. “कितना बडा हो गया रे तू. यहीं बैंगलोर में रहता है क्या?”

“नहीं अंकल, अब पुणे में रहता हूँ. ऑफिस के काम से यहाँ आया था दो दिन के लिए, कल वापस जाऊँगा.” मी उत्तर दिलं.

“अच्छा, कोई बात नहीं. तुम लोगों का डिनर होगा तब मेरा ड्यूटी भी खत्म होगा. अगर टाइम है, तो बाहर ही थोड़ा देर बात कर सकते है?” त्यानं विचारलं. “हाँ, हाँ, बिल्कुल. मुझे तो वैसे भी कोई काम नहीं है”, मी उत्तर दिलं. आणि लगेच पुढची ऑर्डर घ्यायला तो पुढच्या टेबलाकडे निघून गेला.

आम्ही उठलो तसं त्यानं बोटं उंचावून दहा मिनिटांची खूण केली. माझ्या मित्रांना गुडबाय करून मी रॉयची वाट पाहत पार्किंग मध्ये थांबलो. तेवढ्या वेळात मी भूतकाळात गेलो आणि रॉयची पहिल्यांदा भेट झाली, त्या दिवसापासून तो गेला तोपर्यंतचा सगळा काळ आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढला.

नागपूरात माझे वडील आणि आयुर्विमा महामंडळात त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर कारकून मंडळींनी कंपनीकडून मिळणाऱ्या स्वस्त गृहकर्जातून घरं बांधली आणि त्यातून आमची विमानगर नावाची कॉलोनी अस्तित्वात आली. त्यात काही मंडळींनी वरचे पैसे टाकून दोन खोल्या वाढवून घेतल्या आणि त्या भाड्यानं काढल्या. त्यात आमच्या समोर राहणारे सुदामे काका पण होते. आणि त्यांच्या घरात राहायला आलेला रॉय आणि त्याची बायको, हे पहिले भाडेकरू.

नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला इंटरनेट नव्हतं, केबल टीव्हीबद्दल फक्त ऐकलं होतं. आमच्या कॉलनीत सगळेच स्कूटरवाले, चारचाकी कोणाकडेच नव्हत्या, तो काळ. रोज संध्याकाळी घरासमोर रस्त्यावरच क्रिकेट खेळणे, एकमेव दूरदर्शनवर असेल त्या मालिका बघणे, हीच आमच्या मनोरंजनाची पर्वणी होती. असेच एक दिवस आम्ही क्रिकेट खेळत असताना रॉय दांपत्य सुदामे काकांचं घर बघायला आलं. दुसऱ्या दिवशी सुदामे काका त्या माणसाला घेऊन आले व वडिलांना त्याची ओळख करून दिली.

“हे अभिषेक रॉय. एका प्रसिद्ध बारमध्ये मॅनेजर आहेत. वर्षभरापूर्वीच लग्न झालंय”. ही रॉयसोबतची पहिली भेट.

“तुम लोग बाहर क्रिकेट खेलते हो ना? कल देखा था मैंने. मुझे टाइम मिलेगा तो मैं भी खेलूँगा तुम्हारे साथ. चलेगा ना?” त्यानं खास बंगाली शैलीत मिश्किलपणे विचारलं आणि मी पण हसून, “हाँ रॉय अंकल”, अशी हसून दाद दिली.

आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी तो आमच्या कंपूत क्रिकेट खेळायला सामील झाला. “अरे, तुम लोगों का बैट तो पुराना हो गया है. कल मैं एक नया बैट लेकर आता हूँ. तब मज़ा आयेगा खेलने में”. आणि खरंच दुसऱ्या दिवशी एक नवी कोरी बॅट, नवा चेंडू घेऊन तो हजार झाला. त्या दिवसापासून रॉय अंकल आमच्यातलाच एक झाला. कुठलीही औपचारिकता ना बाळगता कॉलनीतल्या कुठल्याही मित्राकडे जाण्याचे ते दिवस होते. तसेच आम्ही रॉय अंकलच्या घरी पण सहजच जायला लागलो. १२ ते १५ वर्षांच्या आम्हा मुलांसोबत रॉय अंकल आणि कुहू ऑंटी अगदी एकरूप होऊन गेले. समोरासमोर आम्ही त्याला अंकल म्हणत असलो तरी त्याच्या माघारी त्याचा उल्लेख इतर वडिलधाऱ्या मंडळींप्रमाणे रॉय, असा एकेरीच करायचो.

रॉय म्हणजे अगदी दिलदार, राजा माणूस. त्या दिवसापासून आमचा बॉलचा खर्च वाचला. पण रॉय तेवढ्यावरच थांबला नाही. आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, तसं त्यानं रात्री बॅडमिंटन खेळायची टूम काढली. नेट, चार-सहा रॅकेट्स, त्यानंच विकत आणल्या व आपल्या घरापासून आमच्या कोर्टपर्यंत विजेची तार टाकून प्रकाशाची व्यवस्था केली. म्हणजे सगळं खर्च त्यानंच केला, आम्हाला आनंद मिळावा म्हणून. सुट्टीच्या दिवशी आम्हाला एखाद्या सहलीला घेऊन जाणे व त्याचा संपूर्ण खर्च करणे, ही अशीच एक सवय. त्याचा मनमिळावू स्वभाव आणि सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे तो फक्त आमचाच नव्हे, तर सगळ्यांचाच  लाडका झाला होता. आमच्याबरोबर क्रिकेट खेळायचा तेवढ्याच आवडीनं आमच्या पालकांसोबत तो रमी खेळायचा. लहान मुलांसारखा चिडायचा, भांडायचा, पण हे सगळं अगदी आपुलकीनं.

त्याचे कपडे अगदीच भारी असायचे. दर सहा-आठ महिन्यांनी तो आपली स्कूटर विकून नवी स्कूटर घेत असे. यात दर वेळी चार-पाच हजारांचा तोटा अगदी सहजपणे पचवायचा. त्याच्या घरातली प्रत्येक वस्तू उंची असायची. एका बार मॅनेजरकडे एवढे पैसे कसे काय, असा विचार पण आम्ही कधी केला नाही. 

“एक दिन मुझे अपना रेस्टॉरेंट खोलना है. वो भी अपने पैसों से, कोई कर्ज़ लिए बिना”, असं तो नेहमी बोलायचा. त्याचा आत्मचिश्वास पाहून तो एक दिवस स्वतःचं रेस्टॉरेंट नक्कीच सुरू करणार, याबद्दल सगळ्यांनाच खात्री होती. एवढंच नव्हे तर आमच्या कॉलनीत पहिली कार पण तोच घेणार आणि आम्हाला दूरवर फिरायला नेणार, अशी स्वप्नं देखील आम्ही रंगवत होतो.

रॉय आमच्या कॉलनीत राहायला आला त्याला आता दोन वर्षं झाली होती. आणि एक दिवस पहाटे पोलिसांच्या दोन-तीन गाड्या सुदामे काकांच्या दारात येऊन थांबल्या. त्यांनी आत जाऊन रॉयला त्याच्या दंडांना पकडून बाहेर आणलं आणि आम्हा सगळ्यांच्या देखत त्याला गाडीत बसवून घेऊन गेले. रॉयला अटक होणे, हा आम्हा सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता. थोड्या दिवसातच त्याबद्दल माहिती समोर आली. 

रॉय फक्त बार मॅनेजर नव्हता, तर त्याचे अजूनही उद्योग होते, कदाचित बेकायदेशीर. नेमकं काय झालं ते कळलं नाही, पण भागीदारांमध्ये वाद होऊन त्यात एकाचा खून झाला, असं माझ्या वडिलांनी नंतर आम्हाला सांगितलं. रॉयला अटक झाल्यावर कुहू ऑंटीचे वडील तिला आपल्यासोबत घेऊन कलकत्याला गेले. थोडे दिवस चर्चेत राहिलेला रॉय त्यानंतर हळूहळू विस्मरणात गेला, व कॉलनीतलं सगळ्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे वाहू लागलं.

ही भूतकाळातली सफर संपत असतानाच रॉय बाहेर आला. अंगावर अजूनही जेवणाची ऑर्डर घेणाऱ्या कॅप्टनचा पोशाख होता. त्यानं त्यानंतरची त्याची हकीकत सांगितल्यावर तर मी अगदी नि:शब्दच झालो. खुनाच्या आरोपात अटक झाल्यामुळे त्याला जामीन देखील मिळाला नाही. शेवटी सात वर्षांची शिक्षा झाली. दरम्यान, त्याच्या सासऱ्यांनी झटपट घटस्फोट मिळवून दिला व कुहूचं लग्न दुसरीकडे लावून दिलं. रॉय आणि कुहूचं लग्न तिच्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध झालं होतं व म्हणून त्यांचा त्याच्यावर राग होता, हे पण त्यानं सांगितलं.

कुहू आयुष्यातून गेल्याचं कळल्यावर रॉय अगदीच उन्मळून गेला, व त्यानं आपल्या शिक्षेविरुद्ध दाद देखील मागितली नाही. रॉयनं पाच वर्षं तुरुंगात काढली व चांगल्या वर्तणुकीबद्दल लवकर बाहेर आला. पण त्याच्या घरच्या लोकांनी त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले व त्याला घरात सुद्धा घेतलं नाही. आणि त्यानंतर गेली पंधरा वर्षं रॉय एक शहरातून दुसऱ्या, व दुसऱ्यातून तिसऱ्या शहरात फिरत होता. मिळेल ती नोकरी करायची, कंटाळा आला की शहर बदलायचं, अशी त्यानं तुरुंगानंतरचं आयुष्य काढलं होतं. कुहूची भेट घेण्याचा प्रश्नच नव्हता व दुसरं लग्न होण्याची आता सुतराम शक्यता नव्हती. आणि आता तोच रॉय माझ्यासमोर उभा होता. थोडा खंगलेला, वयापेक्षा म्हातारा दिसणारा, पण डोळ्यात अजूनही तीच चमक असणार रॉय.

“लाइफ में ग़लतियाँ सब लोग करते है, वैसे मैंने भी की. ज़िंदगी में अपना बार खोलने का सपना देखा था, उसी सपनें को हकीकत में लाने की कोशिश कर रहा था. जो मर्डर हुआ, उसमें मेरा कोई हाथ नहीं था, बस संगत ग़लत थी इसलिए फंस गया. माँ-बाप, सास-ससुर, सबके नाराज़ होते हुए भी शादी की, इसलिए शादी भी शायद टूट गई. सब इसी जनम में वापस करना पडता है ना? मैने भी वापस कर दिया. अब कोई उधार नहीं है जिंदगी का मुझपर”. चेहऱ्यावर हसू आणून रॉय म्हणाला. “अब अपनी मर्ज़ी की ज़िंदगी जी रहा हूँ, ना किसी का एहसान है, और ना कोई क़र्ज़ा. आझाद पंछी हूँ जैसे.”

“लेकिन अंकल, आपके सपने? कोई गलती ना होने की इतनी बड़ी सज़ा? और ये दर-बदर की ठोकरें खाना क्या ज़िंदगी है? आप अपने आप को झूठी तसल्ली दे रहे हैं.” मी म्हणालो.

“नहीं, बेटा. मैं ये मानता हूँ कि अगर अपने बुरे कर्मों की सज़ा अगर इसी जन्म में भुगतनी पड़ती है, तो अपने अच्छे कर्मों का फल भी इसी जीवन में मिलेगा. जो हुआ, उसकी कोई शिकायत नहीं है. लेकिन जो अच्छा होगा, उसकी आस जरूर है”. रॉयच्या शब्दात त्याचा निग्रह दिसत होता. “सब भगवान पर छोड़ देना चाहिए. और रही बात मेरे सपनों की. सपनें तो बदल भी सकते है ना? तब अपना बार होने का सपना था, अब बचा हुआ जीवन ख़ुशी से बीते, यही सपना है. और हाँ, ये सपना ऐसा है, जो पूरा मेरे कंट्रोल में है. मेरी बीती हुई ज़िन्दगी से इतना ही सीखा है कि सपनें ऐसे देखो, जो कोई और तोड़ ना सके. ठीक है ना?” यावर मी काय बोलणार? सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसानं त्याला आयुष्यावर धडे द्यायचे?

“अच्छा लगा तुझसे मिलकर. कितने सालों बाद कोई अपना मिला है, पर मुझे जाना होगा.” आपल्या हातातील भल्या मोठ्या पुडक्याकडे इशारा करत तो म्हणाला. “होटल में रोज़ बचा हुआ खाना सस्ते में खरीद लेता हूँ, और कभी वृद्धाश्रम, तो कभी बच्चों के अनाथाश्रम में दे आता हूँ. अगर किस्मत में लिखा होगा, तो शायद फिर मिलेंगे”. अंधारात एका बाजूला उभ्या असलेल्या सायकलला त्यानं ते पुडकं अडकवलं व सायकलवर टांग मारून, मला हात हलवत तो निघून पण गेला.

एके काळी मोठमोठी स्वप्नं बघणारा रॉय. कधी सहजपणे माणसात रमणारा, पण आता एकाकी जीवन जगणारा रॉय. आणि आम्हाला आपल्या कारमधून फिरवायच्या गोष्टी करून, आज एका जुनाट सायकलला पायडल मारत जाणारा रॉय. यातला खरा कुठला, हे मला सांगता येणार नाही, व त्यावर विचार पण करायचा नाही. पण आयुष्यानं एवढी परीक्षा घेऊन सुद्धा हार न मानणारा, आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून अनाथ-वृद्धांना जेवू घालणारा दिलदार रॉय मात्र अगदी शंभर टक्के खरा. आमचा रॉय अंकल.

Leave a comment