मर्यादा पुरुषोत्तम

उज्जयिनी नगरी, क्षिप्रेच्या काठी असलेल्या गुरु सांदीपनींच्या आश्रमात आज फारच धावपळ होती. ६४ दिवसांचं राज्यशास्त्राचं विद्यार्जन पूर्ण करून, त्यांचे शिष्य उद्या घरी जाणार होते. आजचा दीक्षांत समारंभ व्यवस्थित पार पडावा म्हणून सगळेच झटत होते. तसेच संध्याकाळी गुरूवर्य संदीपनींचं विशेष कथाकथनाचं सत्र होतं, त्याचीही तयारी सुरू होती. इतक्या दिवसांच्या साधनेची जणू ती फलश्रुतीच होती.

सायंकाळी प्रार्थना झाल्यानंतर गुरूवर्य सांदीपनी आणि सगळे शिष्य, असं नदीकाठच्या पारावर ते अधिवेशन सुरू झालं. कुठली कथा सांगायची, हे त्यांनी शिष्यांवरच सोपवलं होतं. “गुरुदेव, परत एकदा श्रीरामाची कथा सांगा”, असं कोणीतरी बोललं, आणि सर्वांनीच त्याला मान्यता दिली. गुरुदेवांचं कथा निरूपण म्हणजे जणू अमृताचा प्रवाहच. त्रेतायुगातल्या त्या महानायकाची कथा संपेपर्यंत सगळा शिष्यवृंद मंत्रमुग्ध झाला होता.

“अतिशय सुंदर. श्रीरामाला माझा नमस्कार असो”. कथा संपल्यावर बलरामाच्या मुखातून उत्स्फूर्तपणे शब्द उद्गारले गेले. बलराम, कृष्ण, मथुरेहून त्यांच्यासोबत आलेले काही सवंगडी, तसेच इतर काही राज्यांचे राजपुत्र त्या गटात होते. त्यातच उज्जयिनीचा युवराज सुकेशी देखील होता. त्याच्या मते, कृष्ण आणि बलराम हे राजपुत्र नव्हते, म्हणून त्यांना गुरुदेवांनी राज्यशास्त्राचं शिक्षण देणं अयोग्य होतं. मिळेल तसं तो त्यांचा पाणउतारा  करायचा प्रयत्न करत असे. आताही अशीच संधी मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

“सुंदर? आपल्या पत्नीचा त्याग करणाऱ्या राजाचं चरित्र सुंदर कसं असणार? पत्नीवर खरंच प्रेम असतं, तर राज्याचा त्याग करून, रामानं सुद्धा वनवास भोगायला हवा होता. रामाचं कौतुक करावं असं त्याच्या चरित्रात काही आहे, असं मला तरी वाटत नाही.” कुत्सितपणे सुकेशी बोलला आणि सभा अचानकच गंभीर झाली.

गुरुदेव त्याला उत्तर देणार, त्यापूर्वीच कृष्ण उठला आणि गुरुदेवांना त्यावर भाष्य करायची त्यानं परवानगी मागितली. गुरुदेवांनी अर्थातच त्याला मान्यता दिली, आणि या चर्चेत पुढे काय होणार याच्या उत्सुकतेत सगळेच शिष्य कृष्णाकडे वळले.

“मुळात रामाच्या अवताराचं प्रयोजन समजून घेणं महत्वाचं आहे. रावणाचा अंत करून सत्याचा असत्यावर विजय साध्य करणे, एवढं एकच कारण आपल्याला माहीत असतं. पण त्रेतायुगात एक आदर्श राज्य स्थापन करून, इतर राज्यकर्त्यांसमोर एक परिपाठ तयार करण्याची कामगिरी देखील त्याच्यावर होती. तो काळ असा होता, की आपली संपत्ती वाढविणे, साम्राज्याचा विस्तार करणे, व प्रसंगी कट कारस्थानांचा वापर करून इतर राज्यांना परास्त करणे, हाच राजधर्म असल्याप्रमाणे अनेक शासक वागत असत. प्रजेबद्दल अनासक्ती होती. अशा क्षत्रिय राजांवर प्रजेचा विश्वास तर नव्हताच, पण त्यांच्याबद्दल आदर पण नव्हता. आणि म्हणून एका क्षत्रिय राजानंच या व्यवस्थेत बदल करणं आवश्यक होतं. क्षत्रियांना त्यांचा मान आणि प्रजेला न्याय परत मिळवून देणं, हे कुठल्याच सामान्य राजाला शक्य नव्हतं. म्हणूनच हे दायित्व रामानं उचललं आणि यशस्वीपणे पूर्ण देखील केलं. आजही कुठल्याही उत्तम प्रशासनाला रामराज्याचं विशेषण लावलं जातं, ते यामुळेच. आणि हे दायित्व पूर्ण झाल्याशिवाय राजपदाचा त्याग करणं त्याला शक्यच नव्हतं. कुठल्याही नाती व हितसंबंधांपेक्षा मोठी जबाबदारी त्याच्यावर होती. म्हणूनच माता सीतेसोबत वनात जाणं, हा पर्यायच त्याच्याकडे नव्हता.”

“पण म्हणून पत्नीचा त्याग करायचा?” सुकेशीनं विचारलं.

“मुळात त्या परिस्थितीचं अवलोकन करणं आवश्यक आहे. माता सीतेच्या चारित्र्याबद्दल फक्त त्या एका परीटालाच नव्हे, तर अयोध्येतील इतर अनेक नागरिकांना शंका होती. आपल्या पत्नीचा काहीही दोष नसताना, तिच्याविषयी इतरांनी अशी शंका घ्यावी, हे त्याला मान्य नव्हतं. पण त्या शंकेचं निराकरण फक्त शब्दांनी होणार नाही, याची रामाला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून राजा आणि पती, असं दुहेरी दायित्व असणाऱ्या रामानं जे केलं, ते त्या आर्यावर्तात अभूतपूर्व होतं. त्यानं माता सीतेचा त्याग केला, त्याचा पूर्ण दोष स्वतःवर ओढवून घेतला आणि त्या निर्णयाची सहानुभूती माता सीतेला मिळेल, अशी परस्थिती निर्माण केली. त्यानंतर माता सीतेच्या चारित्र्यावर कोणीही शंका घेतली नाही. तिचा त्याग केल्याबद्दल रामाला मात्र दोष दिला गेला. तो दोष त्यानं आपल्या मस्तकी धारण केला, पण माता सीतेची सुटका केली. या घटनेला आता इतकी सहस्र वर्षं उलटून गेली. पण आजही तुझ्यासारखे लोक सीतेचा त्याग केल्याचा दोष रामावर ढकलतात, पण माता सीतेबदल शंका घेत नाहीत. सीतेवर रामाचं प्रेम नसतं, तर एवढा त्याग त्यानं केला असता का?” कृष्णाच्या या बिनतोड तर्काला उत्तर सुकेशीकडे असणं शक्यच नव्हतं. पण तोही इतक्या लवकर हार मानायला तयार नव्हता.

“यातून एवढंच सिद्ध होतंय की तो एक कुशल, निर्णयक्षम राजा होता. पण म्हणून त्यानं पतीचं कर्तव्य पार पाडलं, असं सिद्ध होत नाही, व त्याचं सीतेवर प्रेम होतं, असा निष्कर्ष तर मुळीच काढता येणार नाही.” सुकेशी उत्तरला.

आता मात्र कृष्णाची मुद्रा करारी झाली. त्याचे डोळ्यात अंगार दिसत होता. त्याच्या शब्दांना देखील धार चढली. “रामाचं सीतेवर प्रेम होतं की नाही, अशी शंका असणाऱ्यांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. कुठलंही सैन्य, सुखसोयी सोबत नसताना, असंख्य अरण्यं पालथी करत आपल्या पत्नीचा शोध घेणारा, आपल्या क्रोधावर पूर्ण नियंत्रण असून सुद्धा, सागर आपल्याला मार्ग प्रदान करत नाही म्हणून त्याच्यावर ब्रह्मास्त्राचा वापर करणारा, मिळेल त्या वानर सैन्याला सोबत घेऊन त्याच सागरावर अशक्यप्राय सेतू बांधून लंकेवर स्वारी करणारा, आपल्यापेक्षा कितीतरी सक्षम सैन्य बाळगणाऱ्या रावणाचा निःपात करून माता सीतेची सुटका करणारा दुसरा राजा कोणी बघितलाय का? वालीचा वध करून त्यानं किष्किंधेचं राज्य घेतलं नाही, की रावणाचा पराभव करून लंकेवर राज्य केलं नाही. त्याला एकच ध्यास होता, एकच लक्ष्य होतं. प्राणाहूनही प्रिय असणाऱ्या सीतेची सुटका करणे, यापलीकडे त्यानं काहीच बघितलं नाही. आपला अरण्यवास संपत असताना, सीतेला विसरून दुसरा विवाह करून अयोध्येवर राज्य करण्याचा विचार देखील त्याला शिवला नाही. त्याला सीतेची सुटका करणे, यापलीकडे काहीच कर्तव्य मोठं वाटत नव्हतं. अशा या मर्यादा पुरुषोत्तमाचं माता सीतेवर प्रेम नव्हतं, असं अजूनही कोणाला खरं वाटेल काय?” कृष्ण इतका तल्लीन झाला होता, की जणू त्याच्या वाचेतून भगवान श्रीरामच आपली कधीही न मांडलेली बाजू सर्वांसमोर मांडत आहेत, असं अनेकांना वाटू लागलं.

“अर्थात, यानंतरही अनेकांना रामाच्या त्यागाची कल्पना करता येणार नाही, हे मला ठाऊक आहे. या युगातच नव्हे, तर येणाऱ्या कलियुगात देखील त्याच्यावर शंका घेणारे अनेक लोक असतील. पण आपल्या पत्नीचा त्याग करून सुद्धा, आपलं तिच्यावर असलेलं प्रेम जपणारा राम त्यापूर्वी कधी झाला नाही, आणि यानंतरही होणार नाही, याची मला खात्री आहे. आणि तेच त्याच्या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे, आणि पावती सुद्धा.” एवढं बोलून कृष्ण खाली बसला.

फक्त सुकेशीच नव्हे, तर इतर सगळेच स्तब्ध झाले होते. श्रीरामाविषयी एक नवीन दृष्टिकोन सगळ्यांना प्राप्त झाला होता, व तो घेऊनच ते सगळे उद्या सकाळी आपल्या घरी जाणार होते. शेवटी त्या स्तब्धतेचा भंग गुरुवर्य संदीपानी यांच्या मुखातून प्रकट झालेल्या शब्दांनीच झाला.

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ।।

Leave a comment