धर्मयुद्ध

“हे धर्मयुद्ध आहे. आणि हे युद्ध जिंकायचं असेल, तर आपल्याला पूर्ण क्षमतेनं लढावं लागेल. पण त्या दृष्टीनं आपली तयारी झाली आहे, असं मला तरी वाटत नाही. तुम्हा प्रत्येकाकडे काहीतरी एक असाधारण युद्धकला आहे. त्याचा युद्धात उपयोग निश्चितच होईल. पण मानवी पैलू पडतात, तेंव्हा त्यात दोष देखील तयार होतात, आपल्यातही आहेत. ते तसेच ठेवून युद्ध जिंकण्याचा विचार सुद्धा घातक ठरू शकतो.”

महाभारताच्या युद्धाची पूर्वसंध्या. मावळत्या सूर्याच्या सोनेरी संधिप्रकाशात कुरुक्षेत्राची रणभूमी न्हाऊन निघाली होती. उद्यापासून पुढे कितीतरी दिवस इथे लक्षावधी देह धारातीर्थी पडणार होते. कारण युद्ध टाळायचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते. अगदी कृष्णाची शिष्टाई सुद्धा कामी आलेली नव्हती. शेवटी युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर दोन्ही बाजूंकडून आपापल्या सैन्याला बळ देण्यासाठी इतर राजे, सैन्य यांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ सुरु झाली. कृष्णाचं यादवी सैन्य कौरवांकडून तर स्वतः कृष्ण पांडवांकडून, पण युद्धात शस्त्र न उचलण्याच्या अटीवर अशी वाटणी झाली होती. कृष्ण आपल्याकडून आहे म्हणजे प्रत्यक्ष धर्मच आपल्या बाजूनं असल्यासारखे पांडव निश्चिंत होते. पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न इतर सेनानायकांशी चर्चा करायला बाहेर पडला होता. त्या क्षणी युधिष्ठिराच्या शिबिरात पांडव, कृष्ण आणि द्रौपदीच होते. आणि तशातच कृष्णानं हे धक्कादायक विधान करुन सगळ्यांच्या पोटात गोळा आणला.

“कृष्णा, अरे हे काय? उद्या सकाळी आपण रणशिंग फुंकणार, आणि तुला आता आपल्या तयारीविषयी शंका आहे? आपला पराभव होऊ शकतो, असं तुला वाटतंय का? जर आपल्या विजयाची शाश्वती नसेल, तर आपण हे युद्ध का करतोय? आता आपण काय करावं, याविषयी काहीतरी बोल.” युधिष्ठिराच्या शब्दांतून काळजी अगदी स्पष्टपणे डोकावत होती.

कृष्णानं लगेच उत्तर दिलं नाही. नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं. ते पाहून भीमाचा पारा चढला. “मी आत्ताच दुर्योधनाच्या शिबिरात जातो आणि त्याला इथे फरफटत आणतो. इथेच तुला माझी युद्धाची किती तयारी झाली आहे, ते दाखवून देतो. मग तर झालं? आपल्यात दोष आहेत म्हणे!” त्याचा लालबुंद चेहरा आणि त्वेष बघून कृष्णाचं हास्य अजूनच पसरलं आणि तो म्हणाला, “भीमसेना, तू दुर्योधनाला मल्लात हरवू शकतोस, आणि त्याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. पण हा मल्लयुद्धाचा डाव नाही, तर एक युद्ध आहे. या युद्धभूमीच्या दुसऱ्या टोकाला जे सैन्य आहे, त्यांच्याकडे अनेक मातब्बर योद्धे आहेत. युद्ध जिंकायला बळ आणि बुद्धीचा वापर आवश्यक असतो. शांतपणे, लक्ष विचलित होऊ न देता निर्णय घ्यायचे असतात. पण जर आपल्या मनात दोष असतील, तर आपले निर्णय दोषरहित असणे शक्य नाही.” भीम पुढे काही बोलणार, त्यापूर्वीच अर्जुनानं त्याला थांबण्याचा इशारा केला व तो कृष्णाकडे बघत म्हणाला, “कसला दोष? आणि दोष असला तर उपाय पण असेल ना? काय ते स्पष्ट सांग. असं कोड्यात बोलू नको.”

आता मात्र कृष्ण गंभीर झाला. “आपल्या मनात एक कप्पा असतो, जो आपण सगळ्यांपासून दडवून ठेवतो. त्यात आपल्या दुर्बलता साठलेल्या असतात. त्या नको तेंव्हा प्रकट होतात आणि आपल्याला आपल्याच कर्तृत्वावर शंका यायला लागते. द्विधा मनस्थिती होते, व निर्णय चुकतात. तुम्ही हे युद्धाचं शिवधनुष्य उचललेलं आहे, ते यशस्वीपणे पेलायचं असेल, तर मन निर्मळ आणि उन्मुक्त करायला हवं.”

“म्हणजे काय करायचं?” अर्जुनानं नेहमीच्या गांभीर्यानं विचारलं.

“तुमच्या मनातील सगळ्यात मोठी दुर्बलता इथे प्रकट करा. तुमच्या मते, कुठली गोष्ट इतरांसमोर बोलायला तुम्हा प्रत्येकाला सर्वाधिक संकोच होतो, ती गोष्ट इथे सगळ्यांसमोर मांडा. मला खात्री आहे, तुम्हालाच त्याचं उत्तर सापडेल, आणि आपल्या दुर्बलतेचं प्रकटीकरण आणि समाधान झाल्यामुळे तुमच्या मनावरचं दडपण दूर होईल. त्यामुळे तुम्ही उद्या जास्त परिणामकारक ठराल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणाच्याही दुर्बलतेवर हसायचं नाही आणि कसलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आपल्या दुर्बलतेवर प्रत्येकानं स्वतःच उत्तर शोधायचं आहे. धर्मराज, तुमच्यापासून सुरु करा.” एवढे बोलून कृष्ण बोलायचा थांबला.

सगळ्यांच्या नजरा आता युधिष्ठिराकडे वळल्या. थोडा वेळ विचार करून युधिष्ठिरानं बोलायला सुरवात केली “मी महाप्रतापी महाराज पांडूंचा जेष्ठ पुत्र. त्यांनी अनेक रणांगणं गाजवली. पण अजूनही युद्ध होवू नये, या मताचा आहे. कदाचित क्षत्रियकुलात जन्म होऊन सुद्धा युद्धाविषयी माझ्या मनात असलेली वितृष्णा, हीच माझी सगळ्यात मोठी दुर्बलता. पण या युद्धाचं वर्णन तू आत्ता धर्मयुद्ध असं केलं आणि मला खात्री पटली की धर्माची पुनःस्थापना करायची असेल, तर हे युद्ध आवश्यकच आहे. या युद्धाच्या परिणामाविषयी माझ्या मनात असलेली शंका आता दूर झाली आहे. मनात कसलंही मळभ राहिलेलं नाही.”

“मी शिघ्रकोपी आहे, हीच माझी दुर्बलता”. भीम आता बोलता झाला. “रागाच्या भरात माझ्याकडून अनेकदा चुका झालेल्या आहेत, आणि त्याचे परिणाम माझ्यासोबत सगळ्यांनाच भोगावे लागले आहेत. द्युतसभेत ज्या हातानं दुःशासनानं द्रौपदीची वस्त्रं फेडली, तो हात मुळापासून भंग करायची प्रतिज्ञा मी केली, ती संताप अनावर झाल्यामुळेच. तसेच, आम्ही अज्ञातवासात विराटनगरी होतो, त्यावेळी द्रौपदीवर भाळलेल्या कीचकाचा वध देखील मी केला, तो देखिल अत्याधिक क्रोध झाल्यामुळेच.”

थोडं थांबून भीमानं परत बोलायला सुरवात केली, “पण आता माझी दुर्बलता माझ्या लक्षात आल्यामुळे मी तिलाच युद्धात माझं शस्त्र बनवणार आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल, तर माझ्या रागावर नियंत्रण मिळवणे, हे उत्तर असू शकत नाही. पण माझ्या रागाला कसे व कोणावर केंद्रित करायचे, हे मला उमगलंय. त्याव्यतिरिक्त मी कुठेही माझ्याच रागाला या युद्धकाळात बळी पडणार नाही.” बोलता-बोलता त्यानं द्रौपदीकडे कटाक्ष टाकला. कदाचित तिचे मोकळी केस बघून त्याच्या चेहऱ्यावर एक संतापाची लेकर उमटली, पण क्षणभरच. आणि परत शांत स्वरात तो उच्चारला, “द्रौपदीवर झालेल्या अपमानाचा प्रतिशोध मी घेणारच. पण रागाच्या भरात तुम्हाला कोणालाही युद्धकाळात त्रास होईल, असं काहीही करणार नाही, याविषयी खात्री बाळगा.”

भीम खरोखरच शिघ्रकोपी होता, पण तेवढाच मनानं हळवा होता. त्याच्या वक्तव्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली. कुठल्याही परिस्थितीत मोठ्या भावाविषयी आदर आणि इतर भावंडांवर माया असणारा, द्रौपदीच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहेत, याची तमा न बाळगता तिच्यावर मनापासून प्रेम करणारा बलदंड, पण निर्मळ मनाचा भीम. त्याचे शब्द ऐकताच सगळे बंधू भारावून गेले. द्रौपदीच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली आणि ते ओघळू नयेत म्हणून तिनं डोळे गच्च मिटून घेतले.

तो आवेग ओसरल्यानंतर नेहमीच्या शांत, संयमित शब्दात अर्जुनानं प्रतिपादन केलं, “माझी दुर्बलता याज्ञसेनी द्रौपदी. अगदी तिच्या स्वयंवराचा पण जिंकला, त्या क्षणापासून. त्यानंतर जे काही घडलं, त्यावर माझं काहीच नियंत्रण नसल्यामुळे चडफडलो. आपल्या हतबलतेवर रागही आला. पण माझ्यापेक्षा द्रौपदीचं काय होईल, हा विचार मनात येताच माझा राग कुठल्याकुठे पळून गेला. तिच्यावर ओढवलेलं धर्मसंकट आपल्या मनातल्या विकारापेक्षा कितीतरी मोठं आहे, या विचारानं स्वतःची लाज वाटली. आणि निर्धार केला – तिला हळूवारपणे जपायचं, तिच्यासोबत जेवढा काळ घालवता येईल त्यात तिच्या सगळ्या आकांक्षा पूर्ण करायच्या, आणि ती नसताना तिच्या सानिध्याच्या अपेक्षेत दिवस काढायचे.”

“हे युद्ध फक्त इंद्रप्रस्थाचं राज्य परत मिळवण्यासाठी नाही, तर द्रौपदीसाठीही आहे. तिच्यासाठी आम्ही हे युद्ध जिंकणारच, याविषयी शंका नको. द्युतसभेत तिची झालेली विटंबना, बारा वर्षांचा वनवास, एक वर्षाचा अज्ञातवास, त्या काळात आलेली संकटं, या सगळ्यांना समर्थपणे तोंड देणाऱ्या द्रौपदीसाठी हे युद्ध आम्हाला जिंकण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून, जी माझी दुर्बलता, तीच द्रौपदी माझी शक्ती, तीच माझी स्फूर्ती.” अर्जुनच्या शब्दांना आत धार चढली होती.

आत्तापर्यंत रोखून धरलेल्या अश्रूंना द्रौपदीनं वाट करुन दिली. ते रोखणं तिला आता अशक्य होतं. ज्या अर्जुनासाठी माहेरचे सगळे पाश तोडून ती अरण्यातले काटे तुडवत, संन्यस्त जीवन जगायला तयार झाली होती, तो तिचा फाल्गुनी अर्जुन. तो कुरुवंशी राजपुत्र आणि आर्यावर्तातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, हे तिच्या गावीही नव्हतं. पण ते कळल्याबरोबर होत्याचं नव्हतं झालं. आयुष्यानं सारीपाट मांडावा आणि नियतीनं तो लगेच मोडून टाकवा, असं तिचं आयुष्य झालं. त्या सगळ्या प्रसंगातून त्याची घालमेल तिला स्पष्ट दिसत होती. पण मातेची आज्ञा आणि मोठ्या भावाच्या धर्मशास्त्रापुढे तो हतबल होता, हेही तिला कळत होतं. इंद्रियांवर ताबा मिळवलेला अर्जुन आपलं वैफल्य तिच्यापुढे कधीच उघड करणार नाही, हे तिला कळून चुकलं. त्याक्षणीच तिनं ठरवलं – त्याच्या अस्वस्थतेत आपण भर घालायची नाही. असं का होऊ दिलंस, हे विचारायचं नाही. चार कालांश झाल्यावर पाचव्यात तो तिला भेटणारच होता. आर्यावर्तातल्या कुठल्याही कुमारिकेला तो जिंकू शकत होता, पण तरीही त्यानं आपल्याला जिंकलं यापेक्षा अजून काय आनंद मानायचा? आज, इतक्या वर्षांनंतर त्यानं आपल्या मनातला दुर्बलतेचा कप्पा उघडला आणि ती धन्य झाली.

सगळ्यांची दृष्टी आता सहदेवावर होती. सहदेव म्हणजे तत्वज्ञानाचा मेरू. अर्जुनासारखा शांत, प्रत्येक शब्द मोजून बोलणारा वेत्ता. “माझे जेष्ठ बंधू श्रेष्ठ देखील आहेत. धर्म, नीतीमत्ता, न्याय यांचा कोश म्हणजे युधिष्ठिर, बाहुबल आणि बुद्धीचा मेळ असलेला भीम आणि संयमी, पराक्रमी अर्जुन. या सगळ्यांच्या अलौकिक क्षमतांमुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड अभिमान, पण स्वत:बद्दल न्यूनगंड आहे. त्यांच्याकडे जे आहे, त्यापैकी माझ्याकडे काहीच नाही, हा न्यूनगंड. पण या दुर्बलतेवर मात करणारी शक्ती म्हणजे माझी माता कुंती. तिच्या पोटी माझा जन्म झाला नसला, तरी आम्ही एकच आहोत, आणि माझ्या भावांकडे असलेल्या गुणांवर माझा पण हक्क आहे, हा आत्मविश्वास तिच्यामुळेच मला प्राप्त झाला. तिचा आशिर्वाद असल्यास एक काय, अनेक कुरुक्षेत्र आम्ही जिंकू शकतो.” सगळ्या भावांनी माना डोलावून त्याचं समर्थन केलं.

“ज्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, त्याच्यापेक्षा जास्त दुर्बल कोण असणार? माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत, की मनात असंख्य प्रश्नांची गर्दी गर्दी होत असे. हे असंच का, हे न कळून सुद्धा कधी मनातल्या शंकेचं निरसन मी केलं नाही. लाक्षागृहात आम्हाला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतर आम्ही हस्तीनापुरला न जाता दुसरीकडे का गेलो, अर्जुनानं स्वयंवराचा पण जिंकला मग द्रौपदी आम्हा सगळ्यांची भार्या कशी होऊ शकते, द्युताचं निमंत्रण एक क्षत्रिय का नाकारू शकत नाही, आपला विनाश डोळ्यांसमोर दिसत असताना दुर्योधन युद्ध करायला का अधीर झालाय, असे असंख्य प्रश्न त्या-त्या प्रसंगी मनात आले, पण कोणाला विचारू शकलो नाही.” आपण बोलतोय, ते कदाचित इतरांना आवडणार नाही, असं गृहित धरुन नकुल मान खाली घालून, सौम्य शब्दात बोलत होता. “पण आता असं वाटतंय की हे सगळे प्रश्न निरर्थक होते. हे सगळं आमचं प्रारब्धच आहे. आपलं भाग्य आपल्या ताब्यात नसलं तरी कर्म आपल्या हातातच आहे. त्यामुळे हे युद्ध का होतंय, याचा विचार न करता, ते कसं जिंकता येईल, हाच विचार या क्षणी महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं.” नकुल बोलायचं थांबला, तसं एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखा युधिष्ठिरानं एक मोठा सुस्कारा टाकला.

“झालं का तुझं समाधान? भोजनाची वेळ कधीच उलटून गेली आहे. मनाची दुर्बलता सोडवताना इथे हा देह दुर्बल होत चाललाय, त्याकडे कोणी लक्ष देईल का?” भीमाशिवाय इतर कोणाला हे वाक्य सुचणे शक्य नव्हते. त्यामुळे वातावरण देखील सैल झालं आणि सगळ्यांनी हसून भीमाला दाद दिली. पण कृष्णाचा खेळ अजुन संपला नव्हता.

“थांबा, उठू नका.” त्याच्या आदेशवजा सूचनेमुळे सगळेच थबकले. “कृष्णे, आता डाव तुझ्यावर”, द्रौपदीकडे बघत कृष्ण बोलला.

“तिचा काय संबंध? ती युद्धात भाग घेणार आहे का? निष्कारण तिला छळू नकोस. तुझ्या खोड्या करायचा उद्योग आता बंद कर”. नेहमीप्रमाणेच द्रौपदीची सोडवणूक करायला भीम पुढे सरसावला.

“असं कसं? तिच्या हातात शस्त्र नसलं तरी ती या युद्धात अपरिहार्य आहे. तुमच्या सगळ्यांप्रमाणेच या युद्धाचे परिणाम तिच्यावर पण होणार आहेत. युद्ध जिंकल्यास ती या आर्यावर्ताची महाराणी होणार. त्यामुळे तिचं मन सुद्धा व्याधिमुक्त आणि प्रसन्न असणं आवश्यक आहे”, कृष्ण म्हणाला.

आपला सखा आपली परीक्षा घेतोय, हे द्रौपदीला कळत होतं. तिच्या मनात व्याधींपेक्षा क्षोभ अधिक होता. तिच्या वाट्याला आलेले भोग, यातना, मानभंगाचे प्रसंग इतर कोणाच्याही वाट्याला आले नसतील. पण ते इथे उगाळण्यात आता काय अर्थ? का कृष्ण मला या संकटात टाकतोय? पदोपदी काळजी लागून राहिलेलं हे मन आता इतकं दुर्बळ झालंय, की त्याची उजळणी करता-करता रात्र सरून जाईल. या सगळ्या विचारांनी ती सैरभैर झाली.

पण कृष्ण आणि कृष्णा ही नावं उगाच जोडलेली नव्हती. त्यांचं सख्य इतर कुठल्याही नात्यापलिकडचं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघताच तिच्या मनात चाललेलं द्वंद्व तो बघू शकत होता. अगदी हळुवारपणे, तिला धीर येईल अशा शब्दात कृष्ण तिला म्हणाला, “तुझ्या मनात याक्षणी भावनांची गर्दी झाली आहे, हे मला कळतंय. पण तू एक सामान्य स्त्री नाहीस, हे विसरू नकोस. तुझ्या वाट्याला आलेल्या अपेष्टा सहन करण्याची शक्ती इतर कुठल्याही स्त्रीत नाही. म्हणूनच तर तुझा जन्म साधारण स्त्रीप्रमाणे न होता, यज्ञाच्या आहुतीतून झालाय. एवढं सगळं भोगून सुद्धा करारी बाण्यानं, ताठ मानेनं या समाजाला प्रश्न करण्याची, आपल्या अधिकारांचं रक्षण करण्याची शिकवण आर्यावर्तात येणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक स्त्रीला देण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि म्हणूनच आपल्या मनाला याक्षणी कमकुवत होऊ देऊ नकोस.”

काही क्षण असेच ओसरले. सगळेच निशब्द होते. शेवटी ही कोंडी द्रौपदीनंच फोडली. “सखा, तुझ्या इच्छेला मी कसं नाकारणार? जर माझ्या व्यक्त होण्यामुळे या युद्धाचा परिणाम सकारात्मक होणार असेल, तर मी नक्कीच व्यक्त होणार. कुठल्याही स्त्रीला पतीचा विरह, ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. माझ्या वाटेला पाच पती आले आहेत. म्हणजेच माझ्या नशिबात हे दुःख होण्याची शक्यता पाचपट अधिक आहे. त्या पाच पतींपासून झालेले माझे पाच पुत्र आहेत. त्यांनी माझ्या मांडीवर खेळायचे दिवस होते, त्यावेळी मी बारा वर्ष वनवासात होते. कलेकलेनं वाढणारी माझीच मुलं मला बघता आली नाहीत. कुणी मागितलं तर आत्ता, याक्षणी, माझ्या मुलांच्या पुढील क्षणांची भागीदार होण्यासाठी मी इंद्रप्रस्थाचा दावा सोडायला सुद्धा तयार आहे. कारण पती बरोबर असले तर मुलं सोबत नाहीत, आणि मुलांच्या सोबत रहायचं तर माझ्या पतींना युद्ध जिंकण्याची पूर्वअट, अशा संकटात मी उभी आहे. त्यामुळे तू कितीही मला धीर द्यायचा प्रयत्न केला, तरी माझं मन कुठल्याही स्त्रीप्रमाणेच स्खलनशील आहे. हीच माझी दुर्बलता नाही का? माझा प्रत्येक पती अद्वितीय आहे. आणि म्हणून त्यातला प्रत्येक मला प्रिय आहे. या समरात काय होईल, कोणी सांगावे? त्यांची काळजी वाटणे, ही माझी दुर्बलता नाही का? माझ्या कुठल्या पुत्रासमोर त्याच्या पित्याशिवाय सामोरं जावं लागेल, या विचारामुळे माझं चित्त स्वस्थ नसेल, तर हीच माझी दुर्बलता नाही का?”

“तू आम्हा सगळ्यांच्या पाठीशी उभा आहेस, तेच काय ते समाधान. तू म्हणजे मुर्तीमंत आशा. गच्च काळोखात गवाक्षातून हलकेच येणारी चंद्रकिरण आधार देते ना, तसा तुझा आधार आहे मला. तूच श्रद्धा, तूच ऊर्जा. तूच या युद्धाची योजना मांडली आहेस, हे ठाऊक आहे मला. त्यामुळे तुझ्यावर राग यायला हवा खरा. पण तू काहीही विनाकारण करत नाहीस, हे पण मी ओळखते. तुलाच आमची काळजी. तुझ्या नावामुळेच मी कृष्णा झाले, त्यामुळे मला न्याय देणं, हे तुझं दायित्वच आहे. आणि म्हणूनच मी या युद्धाच्या परिणामांविषयी सकारात्मकतेनं बघते. माझ्या सगळ्या दुर्बलता तुझ्या चरणी अर्पण.” कितीही खंबीरपणे आपली बाजू द्रौपदीनं मांडली असली, तरी शेवटी तिचा कातर झालेला स्वर सगळ्यांवर घाव करुन गेला.

“पांचाली, अगदी वर्मावरच घाव घातलास. तुझ्यासारखे दुःखाचे डोंगर पादाक्रांत करायची आम्हा भावंडांची क्षमता नाही. आणि तुझ्या आयुष्यात आलेले परीक्षेचे सगळे प्रसंग आमच्यामुळे आलेले आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. तुझे गेलेले दिवस मी परत करू शकत नाही, पण तुला शब्द देतो – माझ्यासह तुझे सगळे पती या युद्धातून सुखरुप परततील. माझ्या भावांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी माझा अडसर दूर करावा लागेल.” अर्जुनाच्या या शब्दांनी तिला बराच धीर आला. त्याच्या क्षमतेवर तिचा पूर्ण विश्वास होता. पण या युद्धात कृष्णाची भूमिका अगदी महत्त्वाची आहे, हे पण तिला ठाऊक होतं. अर्जुनाचा शब्द खरा व्हायचा असेल, तर कृष्ण देखील या युद्धात उन्मुक्त असणं आवश्यक आहे, असा विचार तिच्या मनात आला.

एक निश्वास टाकून द्रौपदी म्हणाली, “कृष्णा, तुझं काय? तू पण या युद्धात समाविष्ट आहेस. उद्या तू देखील निरपेक्ष मनानं युद्धात भाग घ्यावास, ही अपेक्षा योग्यच आहे ना?”

एक सहज हास्य करुन कृष्णानं द्रौपदीकडे बघितलं. “सखी, तुझ्याशी शब्दांचा खेळ करुन जिंकणं अशक्यच. किती अलगदपणे मला माझ्याच डावात अडकवलंस. पण तू म्हणतेस ते योग्यच आहे. कृष्णेप्रमाणेच कृष्णाचा देखील प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी या युद्धाच्या परिणामांपासून तो अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे मलाही माझ्या कमतरता मांडायला हव्यात, नाही का?”

कृष्ण पहिल्यांदाच गंभीर झाला. दारातून बाहेर, दूरवर आपली दृष्टी स्थिर करत तो म्हणाला, “अनादी अनंत असलेलं हे ब्रह्मांड माझी दुर्बलता. या पृथ्वीतलावर असलेला प्रत्येक जीव माझी दुर्बलता. पण माझ्यावर प्रेम करणारे माझं सगळ्यात मोठं मनोदौर्बल्य. माझ्यामुळे त्यांना विलक्षण त्रास देखील होतो, हेही खरं आहे. कठीणसमयी ‘कृष्ण माझा आहे’ असा विचार करणाऱ्यांसाठी मी धावून जातो. कारण ते माझं कर्तव्यच आहे. पण ‘मी कृष्णाचा आहे’ असा भाव ज्याच्या मनात असेल, त्याचा मी बंधक होऊन जातो. त्यातून मला सुटका नसते. त्यांची संकटं, माझी संकटं होऊन जातात. पण ती संकटं झेलण्यात जो विलक्षण आनंद आहे, त्याची कल्पना करणं पण इतरांना शक्य नाही. आणि म्हणूनच या युद्धाचं आव्हान देखील मी माझ्यावर ओढवून घेतलं आहे. धर्माला न्याय आणि अधर्माला शासन, या नियमाला धरूनच हे युद्ध होणार आहे. या युद्धाचे परिणाम भीषण असले, तरी येणाऱ्या युगांना धर्म कळावा, यासाठी हे युद्ध आवश्यकच आहे. कपट करुन कोणाचं राज्य हिरावून घेणं, आणि बलप्रयोग करुन एका स्त्रीचा मानभंग करणं यापुढे होणार नाही, हीच या युद्धाची खरी फलनिष्पत्ति. मात्र असं परत कधी झालंच, तर जिथे ‘मी कृष्णाचा आहे’ हा भाव असेल, तिथे मी धावत जाणारच. हीच माझी दुर्बलता, आणि हेच माझं समाधान.”

सगळ्यांच्या नकळत त्यांचे हात आपोआप जुळले. पांडवांच्या छावणीत एक नीरव शांतता होती. पण युधिष्ठिराच्या शिबिरात आपापल्या दुर्बलतेवर विजय मिळवणारे पांडव आणि त्या भावांच्या केंद्रस्थानी असलेली याज्ञसेनी द्रौपदी उद्या एका नव्या आत्मविश्वासानं या जगाला सामोरे जाणार होते. आणि या घटनेचा साक्षीदार होता, या ब्रह्मांडाचा नायक, योगेश्वर श्रीकृष्ण.

टीप- ही कथा प्रतिभा राय यांच्या द्रौपदी या कादंबरीतल्या एका छोट्याशा प्रसंगापासून प्रेरित आहे. प्रत्येकानं आपल्या मनातली अढी बोलून दाखवावी, असा तो प्रसंग आहे. त्या घटनेचा विस्तार, विचार आणि शेवट मात्र माझा.

One thought on “धर्मयुद्ध

Leave a comment